-
Tuesday, April 6, 2010
रेल्वे-टी. सी. परीक्षेची तयारी
जागतिकीकरणामुळे तसेच उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेमुळे प्रत्येक उद्योगाला कार्याचे ज्ञान असणारे, अनुभव असणारे सुशिक्षित कर्मचाऱ्यांची सतत गरज असते. आता सर्वच क्षेत्रांत किमान शैक्षणिक पात्रता पदवी परीक्षा उत्तीर्ण अशी असताना भारतातील सर्वात मोठय़ा इंडस्ट्रीत म्हणजे रेल्वेमध्ये किमान दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.
नुकत्याच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमध्ये होणाऱ्या भरतीचे संकेत दिल्यानंतर लगेचच रेल्वेच्या विविध बोर्डातर्फे असिस्टंट स्टेशन मास्तर, रिझव्र्हेशन कम एन्क्वायरी क्लर्क या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आता टी. सी., कमर्शिअल क्लार्क, अकाऊंटस् क्लर्क, ज्युनिअर क्लर्क या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दहावी पास उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. या संधीचे सोन्यात रूपांतर करून आपले जीवनमान उंचावण्याची ही एक संधी उपलब्ध झालेली आहे. आपले करिअर, तसेच आपले जीवनमान उंचावण्यासाठी आपणालाच काम करावे लागणार आहे. रेल्वेमधील या नोकऱ्या म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पर्वणी आहे आणि त्यात टी. सी.ची नोकरी या पदाचे आकर्षण बऱ्याच जणांना असते; परंतु ही नोकरी मिळवायची कशी? याबद्दल त्यांना माहीत नसते. आता तर नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी माहिती मिळवायला हवी व नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. यासाठी स्पर्धा परीक्षांची माहिती करून घ्यायला हवी. अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावर प्रावीण्य मिळवायला हवे.
परीक्षापद्धती अभ्यासक्रम व तयारी :- रेल्वे बोर्डाकडून टी. सी., क्लर्क या पदांसाठी निवडप्रक्रिया ही दोन स्तरांवरील लेखी परीक्षांच्या गुणांवर आधारित असेल. ही लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल. या लेखी परीक्षेत इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी, सामान्य अध्ययन, गणित असे साधारणपणे चार विषय आहेत.
बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेचा वेगळा अभ्यास करायचा असतो हेदेखील माहीत नसते. अगदी परीक्षेला एक दिवस असतानाही अभ्यासक्रम समजून घेण्याचा प्रयत्न न करणारे साधारणपणे २५ ते ३० टक्के असतात. अशा या बाबींमुळे स्पर्धा परीक्षांबद्दल बरेच गैरसमज पसरतात. या होणाऱ्या परीक्षेची तारीख रेल्वे बोर्डाकडून जाहिरातीच्या वेळेस जाहीर केलेली नसल्याने नंतर वर्तमानपत्राद्वारे परीक्षेची तारीख जाहीर करतात तसेच परीक्षेपूर्वी साधारणपणे १० ते १५ दिवस अगोदर हॉल तिकीट पाठविले जाते. या परीक्षेसाठी साधारणपणे १०० ते १२० प्रश्न विचारले जातात त्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी देण्यात येतो. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत अवलंबिण्यात येत असल्याने उत्तरे लिहिताना काळजी घेणे आवश्यक आहे. निगेटिव्ह मार्किंग पद्धतीमध्ये १/३ गुण कमी केले जातात.
सामान्य अध्ययन :- या घटकात इतिहास, राज्यशास्त्र, भारतीय संविधान, भूगोल, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी या विषयांचा समावेश केलेला असतो. यापैकी चालू घडामोडी वगळता इतर विषयांचा अभ्यास हा शालेय जीवनात झालेला असतो अथवा या विषयांची ओळख शालेय जीवनापासून असते. तरीसुद्धा या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना पुन्हा एकदा हे विषय अभ्यासणे गरजेचे आहे.
चालू घडामोडी या घटकात राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, क्रीडाविषयक घडामोडींचा समावेश असतो. या घटकाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्रपणे पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. याचा अभ्यास करताना दरवर्षी दिले जाणारे विविध पुरस्कार व सन्मान केलेल्या नियुक्त्या, विविध समित्या व परिषदा, चर्चेतील व्यक्ती, महत्त्वाची पुस्तके, ग्रंथ व लेखक, चर्चेतील ठिकाणे, महत्त्वाची आर्थिक आकडेवारी, कायदे व घटनादुरुस्त्या या गोष्टींची माहिती ठेवणे आवश्यक आहे. या विषयाच्या अभ्यासासाठी लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही वर्तमानपत्रे चांगल्या प्रकारे वाचावीत.
इंग्रजी :- या विभागात इंग्रजी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात. यात गाळलेल्या जागा भरा, वाक्य सुधारून लिहिणे, कॉम्प्रेहेन्शन टेस्ट, वाक्यातील चूक शोधणे, वाक्यांची पुनर्रचना करणे अथवा उताऱ्यांवरील वाक्यांची पुनर्रचना करणे, विरुद्धार्थी व समानार्थी शब्द, चुकीची स्पेलिंग शोधणे, वाक्प्रचार व म्हणी, अशा प्रकारे इंग्रजी विभागातील प्रश्नांचा या परीक्षेसाठी विचार होतो.
बुद्धिमापन चाचणी :- या विभागात शाब्दिक बुद्धिमापन चाचणी व अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी असे दोन विभाग पडतात. शाब्दिक बुद्धिमापन चाचणी या घटकात संख्यामालिकास वर्णमालिका, सांकेतिक भाषा, समान संबंध, विसंगत घटक, दिशाविषयक प्रश्न, नाते-संबंध, बैठक व रांगेतील प्रश्न, तुलनात्मक प्रश्न, कालमापन व दिनदर्शिका, घन व ठोकळ्यावरील प्रश्न, माहितीचे पृथ:क्करण, आकृत्यांची संख्या ओळखणे अशा प्रश्नांचा या विभागात समावेश केलेला असतो. अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी या विभागात आकृतींची मालिका पूर्ण करणे, वेगळी आकृती पर्यायातून निवडणे, समान संबंध असणारी आकृती पर्यायातून निवडणे. अशा प्रश्नांचा या विभागात समावेश केलेला असतो.
गणित :- गणित हा विषय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अविभाज्य असा घटक आहे. जवळजवळ सर्वच स्पर्धा परीक्षांमधील गणिताचा अभ्यासक्रम सारखा असला तरीही त्यांची काठिण्यपातळीही वेगवेगळी असते.
या घटकात संख्या व संख्याप्रणाली, मसावि व लसावि. सरळरूप द्या. गुणोत्तर-प्रमाण, भागीदारी, सरासरी नफा-तोटा, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, काळ-काम व वेग, अंतर-वेग व वेळ, बोट व प्रवाहावरील उदाहरणे, आगगाडीवरील उदाहरणे, शतमान-शेकडेवारी, घनफळ व क्षेत्रफळ, आलेखावर आधारित प्रश्न, समावेश केलेला असतो. याकरिता सर्व सूत्रे व नियम लक्षात असणे आवश्क आहे.
यश मिळविण्यासाठी भरपूर अभ्यास हेच समीकरण आहे हे लक्षात घ्या. आता तर परीक्षादेखील मराठीतून होणार असल्याने रेल्वे परीक्षेत सर्वाधिक मराठी टक्का असे समीकरण बनविण्यासाठी अभ्यासाला लागा.
परीक्षेसाठी शुभेच्छा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment